Mumbai Vande Metro News : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे मेट्रो ट्रेन आणि स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने या गाडीला देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका सभेत कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी घोषणा केली आहे.
एकीकडे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विकसित केले जात आहे तर दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वर्जन देखील लाँच करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला नजीकच्या भविष्यात 12 वंदे मेट्रोची भेट मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार रेल्वे मंत्रालयाचा राजधानी मुंबईत बारा वंदे मेट्रो चालवण्याचा प्लॅन असून यातील पहिली गाडी ही जुलै महिन्यात मुंबईत दाखल होणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मात्र अधिकाऱ्यांनी या संदर्भात आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.
तथापि मीडिया रिपोर्ट नुसार वंदे मेट्रो ही अत्याधुनिक गाडी मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या शहरांमध्ये सुरू होणार अशी शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात वंदे मेट्रो मुंबईमध्ये चालवली जाणार आहे. या गाडीच्या कोचमध्ये दिल्ली मेट्रो प्रमाणे आसन व्यवस्था राहणार आहे.
पंजाब राज्यातील कपूरथळा येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये सध्या वंदे मेट्रोचे कोच तयार केले जात असून सध्या स्थितीला 50 वंदे मेट्रो तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र हळूहळू या गाड्यांची संख्या वाढवली जाईल आणि संपूर्ण देशात चारशे वंदे मेट्रो धावतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
वंदे मेट्रो कोणत्या मार्गांवर चालवली जाणार
वंदे भारत मेट्रो दिल्ली-मेरठ, दिल्ली-गाझियाबाद, मुंबई-ठाणे, आग्रा-मथुरा अशा व्यस्त मार्गांवर चालवली जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. निश्चितच जर मुंबई ते ठाणे दरम्यान वंदे भारत मेट्रो सुरू झाली तर या दोन्ही शहरांमधला प्रवास आणखी जलद होणार आहे.