Nagpur-Goa Highway : महाराष्ट्र राज्य शासनाने नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने या मार्गाच्या अंतिम संरेखणास अर्थातच अलाइनमेंटला मंजुरी दिली आहे. आधी शक्तिपीठ महामार्गाची लांबी 760 km पर्यंत जाईल असा अंदाज होता मात्र अंतिम अलाइनमेंटनुसार या महामार्गाची लांबी 802 km एवढी राहणार आहे.
दरम्यान या अलाइनमेंटला मंजुरी मिळाली असल्याने या महामार्गाच्या पुढील कामाला देखील वेग मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अलाइनमेंटला मंजुरी मिळाल्यानंतर या महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामासाठी राज्यशासनाने मंजुरी दिलेली आहे.
यानुसार येत्या काही दिवसात या मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी मात्र या मार्गासाठी चिन्हांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
चिन्हांकनाचे अर्थातच मार्किंगचे काम सध्या सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार असल्याने जिल्ह्यातील संबंधित गावांमध्ये मार्किंगचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
एकंदरीत नागपूर-गोवा हायवेचे काम आता सुरू झाले आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर येथे चिन्हांकनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उर्वरित गावांमध्ये देखील चिन्हांकन होणार आहे.
कोणत्या गावातून जातो मार्ग
हा मार्ग सांगोला तालुक्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करतो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या बाणूरगडमध्ये या मार्गाचा प्रवेश होतो. पुढे मग हा मार्ग कवठेमहाकाळ तालुक्यातील तिसंगी गावात जाणार आहे. येथून पुढे तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौडे, मणेराजुरी, मतकुणकी या गावातून जाणार आहे.
मतकुणकी या गावातून पुढे हा मार्ग मिरज तालुक्यात प्रवेश करणार आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी अशा गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे या गावात मार्किंगचे काम सुरू झाले आहे.
कसा असेल मार्ग
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. या महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय अहवाल सादर करण्याचे आदेश सप्टेंबर 2022 मध्ये देण्यात आले होते. यानुसार या महामार्गाचा अहवाल शासनाला सादर झाला.
दरम्यान या अहवालाला शासनाने 7 फेब्रुवारी 2024 ला मंजुरी दिलेली आहे. हा महामार्ग वर्धा येथील पवनार येथून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपणार आहे. महामार्ग राज्यातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील शक्तीपीठ यांना एकमेकांना कनेक्ट करणार आहे.
हा मार्ग धार्मिक पर्यटनाला चालना देणार आहे. हा सहा पदरी महामार्ग राहणार असून यामुळे नागपूर ते गोवा हा 21 तासांचा प्रवास फक्त आणि फक्त आठ तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. हा मार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणार असून याची एकूण लांबी 802 किलोमीटर एवढी राहणार आहे.