Onion Rate Ahmednagar : गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे. कांद्याला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आता मात्र कांदा उत्पादकांना दिलासा मिळू लागला आहे. कारण की, बाजारभावात आता चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.
प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी म्हणजे आठ जुलै रोजी उन्हाळी कांद्याला तब्बल 2500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला आहे. जिल्यातील इतरही बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
दरम्यान काल अर्थातच 9 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या कमाल बाजारभावाने दोन हजाराचा टप्पा गाठला आहे. काल झालेल्या लिलावात राहता एपीएमसी मध्ये 29 हजार 735 गोणी कांद्याची आवक झाली. यात प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 750 ते 1450 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला.
तीन नंबर कांद्याला 300 ते 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला. गोल्टी कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल ते 1000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. बेले कांदा अर्थातच जोड कांदा शंभर रुपये प्रति क्विंटल ते तीनशे रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला. एकूणच काय की कमाल बाजार भावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
वास्तविक, जानेवारी महिन्याच्या अखेरपासून कांदा बाजार भावात सातत्याने घसरण सुरु होती. चांगला कांदा फेब्रुवारी ते जून या कालावधीत मात्र दोन ते तीन रुपये प्रति क्विंटल या दरात विकला जात होता. यामुळे तब्बल सहा ते सात महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान या वर्षी उन्हाळी हंगामातील कांदा पिकाला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात घट आली आहे शिवाय उत्पादित झालेला बहुतांशी माल हा अधिक काळ टिकणार नाही असे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा हार्वेस्टिंग झाल्याबरोबर विक्री करण्यास पसंती दाखवली आहे.
मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा आता विक्री झाला आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे तो चांगला दर्जेदार कांदा असून त्या कांद्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलेला नाही. यामुळे आगामी काही दिवसात मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात कमतरता येईल आणि यामुळे दर वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल असे मत काही तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.