Panjab Dakh : काल अर्थातच 25 जून 2023 रोजी मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व समाधान पाहायला मिळाले. वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे.
मान्सूनचे आगमन देखील वेळेतच झाले आहे. शिवाय मान्सून काळात चांगला पाऊस बरसला आहे. यंदा मात्र परिस्थिती भिन्न आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. शिवाय मान्सूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी बराच काळ लागला आहे. विशेष बाब अशी की, आता महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असला तरी देखील अजूनही पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही.
यामुळे सध्या शेतकरी बांधव चिंतेतच आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांची शेत शिवारात लगबग वाढली आहे. अशातच परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी यंदाच्या पावसाळ्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पंजाब डख यांचे हवामान अंदाज चुकले होते. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज खरा ठरला.
यामुळे आता पुढील हवामान कस राहणार याबाबत डख काय मत व्यक्त करत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान त्यांनी काल अर्थातच 25 जून 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात यंदाच्या पावसाळ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी या शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दरवर्षी महाराष्ट्रात मान्सून सात जूनला दाखल होतो. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा ऋतू चक्रात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे हे तिन्ही ऋतू 22 दिवस पुढे सरकले आहेत.
हेच कारण आहे की, पावसाचे आगमन देखील 22 दिवस उशिराने होत आहे. दरम्यान, यंदा देखील पावसाचे आगमन उशिराने झाले असून आता 25 जून पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावर्षी दुष्काळ पडणार नाही मुबलक पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तसेच यंदाच्या पावसाळी काळात कोणत्या तारखेला पाऊस पडणार याबाबत देखील त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते यंदा राज्यात 27 ते 28 जून, 10 जुलै ते 15 जुलै, 18 जुलै ते 19 जुलै या कालावधीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील जवळपास 80% भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच यंदा सप्टेंबर महिन्यात हे चांगला पाऊस होणार असून 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर यावर्षी डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी आत्तापासूनच वर्तवला आहे. डिसेंबर महिन्यात दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.