Panjab Dakh : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. खरंतर राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने उद्यापासून राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी देखील 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी देखील राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी 11 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असे सांगितले आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 10 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. म्हणजेच आजपासून तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. यानंतर मात्र महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत राज्यातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय या कालावधीत अमरावती, अकोला, चांदूरबाजार, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे या संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निश्चितच चिंता वाढणार आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत आणि अशातच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.