Panjab Dakh : सध्या राज्यात सर्वत्र पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राज्यात मान्सून दाखल होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत. आधीच जगभरातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी भारतावर दुष्काळाचे सावट राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यात मान्सूनचे आगमन होऊन पावसाने दडी मारली आहे.
त्यामुळे यंदा खरच दुष्काळ पडणार का हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. विशेषतः अमेरिकेसारख्या विकसित देशाच्या हवामान विभागाने यंदा भारतासह आशिया खंडात दुष्काळाचा अंदाज वर्तवला आहे, यामुळे पावसाला झालेला उशीर हे दुष्काळाचे संकेत आहेत का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे आज पासून मान्सून पूर्व पदावर येणार असून राज्यातील बहुतांशी भागात आजपासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याव्यतिरिक्त पंजाब डख यांनी देखील एक हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
त्यांनी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईसह कोकणातही पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, खरंतर यंदा 8 जूनलाच मान्सूनचा आगमन झालं.
मात्र मान्सून आगमन झाल्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आणि या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास कमकुवत झाला. या वादळाने वातावरणातील बाष्प खेचून घेतले. परिणामी राज्यात पाऊस पडला नाही. आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
आज पासून राज्यात सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. निश्चितच पंजाब डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची शेत शिवारात पुन्हा एकदा लगबग वाढणार आहे. एकंदरीत, शेतकऱ्यांमध्ये जी दुष्काळाची चर्चा होती तिला पंजाब डख यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी दुष्काळ पडणार नाही असं सांगितलं आहे.