Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस पर्यंत ची वाढ नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
एवढेच नाही तर काही ठिकाणी रिमझिम सऱ्या देखील बरसल्या आहेत. तर काही ठिकाणी परतीचा पाऊस चांगला मनसोक्त बरसला आहे. काल नासिक जिल्ह्यातील सटाणा आणि देवळा परिसरात बहुतांशी ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे.
यामुळे ऑक्टोबर हिटने परेशान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय नासिक जिल्ह्यातील या भागात गेल्या महिन्यातही चांगला पाऊस झाला नसल्याने या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. अशातच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात आज अर्थातच 18 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सध्या मोठ्या पावसाची शक्यता खूपच कमी आहे. राज्यात आज पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय गोव्यातही काही ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डख यांनी म्हटल्याप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय आज कोकणातील देवगड, सावंतवाडी या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच गोव्याचा विचार केला असता आज गोव्यातील पणजी व आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण खूप मोठा पाऊस पडणार नाही. फक्त काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील तर काही भागात अगदी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
मात्र राज्यात दसऱ्यानंतर परिस्थिती पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. दसरा झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. म्हणजे आता 24 ऑक्टोबरनंतर पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होणार आहे.
ते म्हटले की, 28 ऑक्टोबर नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होईल आणि नोव्हेंबर महिन्यात यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या काळात यंदा मोठा पाऊस पडेल असेही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.