Panjabrao Dakh Havaman Andaj : यावर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी अमेरिकन हवामान विभागाने एलनिनोचा प्रभाव पाहता भारतासहित आशिया खंडातील बहुतांशी देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले शिवाय मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे हा अंदाज खरा ठरणार की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र जून महिना उलटल्यानंतर पावसाचा जोर वाढला.
जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. या कालावधीत कोकणात आणि विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळाला.
या विभागातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली होती. पण आता गेल्या 14 दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा खंड पडला आहे. दरम्यान आता 20 तारखे नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरवात होणार अशी शक्यता आहे. मात्र जुलै प्रमाणे जोरदार पाऊस होणार नाही असे सांगितले जात आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी राज्यात 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा ऑगस्ट प्रमाणेच पावसाचा मोठा खंड पडणार अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात यावर्षी एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान पावसाचा खंड राहणार आहे. या कालावधीत पाऊस गायब होणार असून 15 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडेल असे त्यांनी नमूद केले आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात पाऊस गायब होणार असला तरी देखील दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यंदा दुष्काळ पडणार नसून समाधानकारक पाऊस पडेल असे देखील त्यांनी सांगितले आहे. यावर्षी राज्यातील सर्वच प्रमुख धरणे 100% क्षमतेने भरतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
यामुळे आता पंजाबरावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 16 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडतो का आणि सप्टेंबर महिन्यातही त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसारच परिस्थिती राहते का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.