Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात कोकणात आणि घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर खूपच कमी आहे. काही भागात तर कडक ऊन पडले आहे. तसेच काही भागात हलका पाऊस होत आहे. अगदी पावसाची रिमझिम सुरू आहे.
यामुळे राज्यातील अनेक भागात अद्याप खरीपातील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. तसेच काही भागात खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत मात्र तेथील पेरण्या पावसाअभावी संकटात सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत, शेतकरी बांधवांना आता जोरदार पावसाची आतुरता लागली आहे.
अशातच आयएमडीने अर्थातच भारतीय हवामान विभागाने चार जुलै पासून राज्यातील मराठवाडा, विदर्भात तसेच संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून अर्थातच 3 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. आज पासून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
डख सांगतात की, ज्यावेळी कोकण किनारपट्टीवर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असतो, तेथे संततधार पाऊस कोसळतो त्यावेळी राज्यातील इतर भागात फक्त वारेच वाहते, पाऊस पडत नाही. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे.
आजपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे आणि आता डख यांनी आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. मात्र आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.