Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विदर्भ आणि कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे.
उर्वरित राज्यात मात्र अजूनही मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला नसून रिमझिम सऱ्या सुरु आहेत. यामुळे बळीराजाची चिंता वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र येत्या काही दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.
यासोबतच परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील एक हवामान अंदाज वर्तवला आहे. काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात पंजाबरावं डख यांनी एका शेतकरी मेळाव्यात हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी डख यांनी उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कसा राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 17 जुलै ते 19 जुलै दरम्यान नासिक जिल्हा सहित सटाणा शहर व आजूबाजूच्या परिसरात ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. विशेष बाब म्हणजे या कालावधीमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता राहणार असल्याचे पंजाबरावांनी नमूद केले आहे.
तसेच 24 जुलै ते 26 जुलै दरम्यान पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होईल मात्र पुन्हा 29 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांनी चिंता करू नये यावर्षी दुष्काळ पडणार नसून चांगला जोरदार पाऊस राहील असे देखील नमूद केले आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सिद्ध होणार आहे.