Panjabrao Dakh Marathi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी खरं तर संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, खऱ्या अर्थाने अहमदनगर, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी देखील होत आहे. यामुळे संबंधित भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर शेतकऱ्यांचे शेती पिके संकटात आली आहेत.
कोकणातील आणि विदर्भातील बहुतांशी नद्या धोक्याच्या पातळीवर पोहचल्या आहेत. काही भागात पूरस्थिती तयार झाली आहे. पुरामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. शेतात, घरात पाणी साचले आहे. अनेकांची घरेच वाहून गेली आहेत.
दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय व्यक्तिमत्व पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
हा पाऊस सर्व दूर राहणार नाही. या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै अर्थातच आज पासून ते 30 जुलै पर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पडणारा पाऊस हा पूर्वेकडून दाखल होणार आहे. पूर्वेकडून येणारा पाऊस हा जोरदार बरसतो. यामुळे या काळात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असे सांगितले जात आहे.
हे सहा दिवस राज्यातील यवतमाळ, हिंगोली, वासिम, परभणी, अकोला, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग, छत्रपती संभाजी नगर, बीड या जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे.
उर्वरित जिल्ह्यात या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हा पाऊस पूर्वेकडून दाखल होणार असल्याने नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.