पुणे जिल्ह्यातील माळरानावर फुलविली सफरचंदाची बाग ! २०० रुपये किलो दराने विक्री आणि महाराष्ट्रात चर्चा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Farmer Success Story :- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील इंद्रायणी तांदळाचे आगार असलेल्या बारे खुर्दमधील प्रयोगशील शेतकरी सौरभ दत्तात्रय खुटवड आणि अजय दत्तात्रय खुटवड यांनी २०२२ मधील मार्च महिन्यात १५ फूट बाय १५ फूट अंतरावर सफरचंदाची लागवड केली आहे. खुटवड बंधूंचे वडील दत्तात्रय खुटवड हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या मुलांनी माळरानावर घेतलेल्या सफरचंदाच्या उत्पादनाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात झाली आहे. तसेच या खोऱ्यात भाताचेदेखील विक्रमी उत्पादन त्यांनी यापूर्वी घेतले आहे.

भोर तालुक्याच्या बारे खुर्दमधील खुटवड बंधूंना बायप संस्थेने सफरचंदाची रोपे विनामूल्य दिली. २०२१ मध्ये डोंगरउतारावर असलेले माळरान फोडून सपाटीकरण करून माळरान शेतीकरिता तयार केले. लागण करण्यापूर्वी माळरानाची उभी-आडवी नांगरट करून घेतली. सफरचंद लागवडीसाठी ३ फूट बाय ३ फूट चौरस खड्डे घेतले. ४ ते ५ दिवस खड़े तापू दिले. त्यानंतर खड्डे पाण्याने भरून घेतले. त्यामुळे खड्डयातील उष्णता कमी झाली. नंतर शेणखत, निंबोळी पेंड, एसएसपी १०:२६:२६ खते, गाळाची माती भरून खड्डे भरून घेतले. नंतर पाणी दिले. जमीन वाफशावर आल्यावर एचआरएम ९९, गोल्डन डोरसेट, अॅपल अॅना जातीच्या रोपाची १० गुंठे क्षेत्रावर ४० रोपांची लागवड केली.

लागण केल्यानंतर दर १० दिवसांनी जीवामृत प्रति झाड एक लीटर या प्रमाणात दिले. तसेच, दर १० दिवसांनी निमार्क व दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने कीड आटोक्यात आणली. सफरचंद लागवड केल्यानंतर आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड ऑगस्ट २०२२ मध्ये केली. लागवड करण्यापूर्वी तीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार करून गांडूळखत भरले. कलकत्ता जातीच्या रोपाची लागवड केली. झेंडूमधून २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे पाणी, सेंद्रिय खते, सेंद्रिय कीटकनाशके यांचा खर्च यातून निघाला. पाणीपुरवठ्याकरिता ३५ मीटर बाय ४५ मीटर एवढे शेततळे तयार केले आहे. ठिबकचा वापर करून पाणी दिले जाते. यंदा आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले आहे. दर तीन महिन्यांनी झाडाची छाटणी केली. तसेच छाटणी झाल्यावर प्रति झाड एक किलो गांडूळखत दिले. मार्च २०२३ मध्ये छाटणी केल्यानंतर फूलधारणा सुरू झाली. एप्रिल २३ मध्ये फळात रूपांतर होण्यास सुरुवात झाली जून २३ मध्ये फळांना रंग येण्यास सुरुवात झाली. जुलै २३ मध्ये सफरचंद पिकून तयार झाले.

सुनील चव्हाण, धीरज देशमुख अक्षय माने, ओंकार दळवी यांनी खुटवड बंधूंना मार्गदर्शन केले. सध्या साधारणतः प्रति झाड पाच किलो फळे मिळत आहेत. या फळांची विक्री शेतावरच होत आहे. २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. खुटवड बंधूंचे वडील दत्तात्रय खुटवड हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या मुलांनी माळरानावर घेतलेल्या सफरचंदाच्या उत्पादनाची चर्चा संपूर्ण तालुकाभर झाली आहे. प्रामुख्याने सफरचंदाची शेती ही थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळते. परंतु, अलीकडील काळात सफरचंदाच्या अनेक नवनवीन सुधारित जाती विकसित झाल्याने ही शेती कोणत्याही प्रदेशात आढळून येत आहे. अशीच शेती वेळवंड खोऱ्यातील बारे खुर्दच्या माळरानावर प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय नानासाहेब खुटवड यांच्या सौरभ व अजय या मुलांनी करत आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शेती व्यवसायाचा स्वीकार केला आहे.

खुटवड बंधूंनी लाल कोबी, लाल ढोबळी मिरची, फ्लॉवर, टोमॅटो, कलिंगड, आंबा, शेवगा अशा अनेक फळभाज्या, पालेभाज्या नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात उत्पादित केल्या आहेत. तसेच या खोऱ्यात भाताचेदेखील विक्रमी उत्पादन त्यांनी यापूर्वी घेतले आहे. नोकरीच्या मागे न धावता वडिलोपार्जित शेती व्यवसाय मुलांनी आनंदाने स्वीकारला असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करत, कमी वेळेत, कमी जागेत, जास्तीत जास्त उत्पादन मुले शेतातून घेत आहेत. यापुढेही शेतात नवनवीन प्रयोग राबवित वेगवेगळी पिके घेणार आहोत.

Leave a Comment