यंदा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले का ? शेतकऱ्यांनी सांगितली मन की बात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे मान्सूनचा पूर्वअनुमान असणे शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाची बाब असते. पावसाचा, हवामानाचा आधीच अंदाज मिळाला तर शेतकऱ्यांना शेती कामांमधील नियोजन करताना मदत होते.

पेरणी केव्हा करायची, कोणत्या वेळी खते द्यायची, औषध फवारणी केव्हा करायची, माल हार्वेस्टिंग केव्हा करायचा यांसारखी एक ना अनेक कामे पावसावर आधारित असतात. त्यामुळे हवामानाचा अंदाज आधीच मिळाला तर शेतकऱ्यांना ही कामे योग्य वेळी करता येतात आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

आता हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवला जातो. यासाठी विशेष यंत्रणा संपूर्ण देशात कार्यान्वित आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी भारतीय हवामान खात्यापेक्षा पंजाबराव डख यांच्या खाजगी हवामान खात्यावर शेतकऱ्यांची अधिक भिस्त आहे.

शेतकरी पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. विशेष बाब अशी की, गेल्या दोन ते तीन वर्षात पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

यंदा मात्र पंजाबरावांचा हवामान अंदाज काही खरा ठरला नाही. यामुळे पंजाब रावांवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. एवढेच नाही तर यावर्षी जेवढे नुकसान हवामानाच्या लहरीपणाने केले नाही तेवढे नुकसान पंजाबरावांच्या हवामान अंदाजामुळे झाले असा आरोपही काही शेतकरी करत आहेत.

खरंतर यावर्षी मान्सून काळात कमी पाऊस पडणार, भारतीय मानसूनवर एलनिनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्यासमवेतच अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता. मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच, अगदी मान्सून सुरू होण्याआधीच अमेरिकन हवामान विभागाने यंदा एल निनोमुळे भारतासहित आशिया खंडात दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला होता.

विशेष बाब अशी की भारतीय हवामान खात्याने यांना एलनिनोमुळे दुष्काळ पडणार नाही मात्र याचा प्रभाव राहू शकतो असे मान्य केले होते. स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील यंदा मान्सून काळात कमी पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त केला होता.

पण पंजाबराव मात्र यंदा सुरुवातीपासूनच भरपूर पाऊस पडणार, यंदा एल निनोचा भारतीय मानसूनवर विपरीत परिणाम होणार नाही असे नमूद करत होते. त्यांनी यावर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेत म्हणजे 7 जून लाच महाराष्ट्रात दाखल होणार असे सांगितले. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसनवारीने पैसे घेत बी-बियाण्यांची आणि खतांची जमवाजमव करून ठेवली.

मात्र त्यांचा हा अंदाज फेल ठरला. यानंतर चक्रीवादळ आले यामुळे पंजाबराव डख आणि भारतीय हवामान खात्याचे अंदाज फेल ठरत होते. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. परंतु पंजाब रावांनी यापुढे राज्यात मोठा पाऊस पडणार, दुष्काळ पडणार नाही असे वारंवार सांगितले.

जुलै महिन्यात कसाबसा पाऊस पडू लागला. पावसाला सुरुवात झाली आणि डख यांनी राज्यात आगामी काळात चांगला पाऊस राहणार असं मत व्यक्त केलं. मग शेतकऱ्यांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुरेसा पाऊस झालेला नव्हता तरीही पेरण्या करून घेतल्या.

जुलै महिन्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. अहमदनगर आणि नाशिक भागात मात्र जुलै महिन्यात देखील फारसा पाऊस झाला नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवत पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पंजाबरावांनी आणखी एक हवामान अंदाज व्यक्त केला.

यानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जोरदार पाऊस होणार असं त्यांनी सांगितलं. यानुसार शेतकऱ्यांनी तुर पिकाला खत दिले. सोयाबीनला खत लावले. पाऊस पडणार चांगले उत्पादन मिळणार या हेतूने शेतकऱ्यांनी महागड्या औषधांच्या फवारण्या देखील केल्या.

मात्र आता दुसरा पंधरवाडा सुरू होऊन एक आठवडा उलटत चालला आहे, येत्या काही दिवसात ऑगस्ट महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे. मात्र तरीही राज्यात जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील ज्या पिकांना खते देण्यात आली आहेत ती पिके आता जळू लागली आहेत.

यामुळे पेरणीसाठी आलेला हजारो रुपयांचा खर्च आणि खतांसाठी तसेच महागड्या औषधांसाठी आलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. म्हणून पंजाबरावांचे हवामान अंदाज फोल ठरु लागले आहेत अशा चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगत आहेत. पंजाब रावांच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असा आरोपही शेतकरी करत आहेत.

सध्या फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पंजाब रावांचे हवामान अंदाज चुकलेत, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. अनेक शेतकरी पंजाबरावांना दोष देत आहेत तर काही शेतकऱ्यांनी हवामान अंदाज एखाद्यावेळी चुकूही शकतो असे सांगत पंजाबरावांचा बचाव देखील केला आहे.

Leave a Comment