Panjabrao Dakh News : येत्या काही दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेत शिवारात रमणार आहे. मात्र यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी खूपच त्रासदायक ठरणार आहे.
कारण की, मान्सून काळात चांगला पाऊस बरसला नसल्याने अनेक भागात पाणी संकट तयार झाले आहे. काही ठिकाणी परिस्थिती एवढी बिकट आहे की रब्बी हंगामातील पिकांची पेरणी देखील होऊ शकणार नाही. या अशा विपरीत आणि विदारक परिस्थितीमध्ये बळीराजा पूर्णपणे हताश आणि नैराश्यात आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल असा दावा हवामान खात्याने केला आहे. सध्या कोकणातील वेंगुर्ला येथे मानसून रेंगाळलेला आहे. परंतु येथूनही काही दिवसात मान्सून माघारी परतेल असे सांगितले जात आहे.
दरम्यान परतीचा पाऊस देखील महाराष्ट्रात म्हणावा तसा बरसलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत दिवसेंदिवस वाढचं होत आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोल्हापूर, कोकणसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणीपूर्वी पंजाबरावांचा हा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी विशेष दिलासादायक ठरेल असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.
कारण की पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आजपासून आगामी तीन दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, देवगड आणि संपूर्ण कोकणात हलका पाऊस पडेल असे पंजाबरावांनी सांगितले आहे. यानंतर मात्र राज्यात पुन्हा एकदा 28 ऑक्टोबरच्या सुमारास पोषक परिस्थिती तयार होणार आहे. 28 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल आणि यंदा नोव्हेंबर महिन्यात चांगला मोठा पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
विशेषता दिवाळीच्या काळात यावर्षी चांगला पाऊस बरसेल असे त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. यामुळे जर पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर रब्बी हंगामापूर्वीच शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज ठरू शकते.