Pm Kisan Yojana Latest Update : केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपला दुसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वीच देशातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून ही स्कीम अविरतपणे सुरू आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना लाभान्वित केले जात आहे. ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.
या योजनेअंतर्गत थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जात असल्याने ही योजना अल्पावधीतच देशातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो शेतकऱ्यांना 14 हप्ते देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पंधराव्या हफ्त्याची आतुरता लागली आहे. काही मीडिया रिपोर्ट मध्ये या योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार असा दावा केला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. जर दिवाळीच्या काळात या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा डिसेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच या योजनेचा हप्ता मिळेल असे सांगितले जात आहे.
खरंतर पीएम किसानचा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दिला जातो. मागील हफ्ता हा 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. यामुळे या योजनेचा 15वा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, दिवाळी सणाला दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे यामुळे दिवाळीच्या काळात या योजनेचा हप्ता केंद्र शासनाकडून दिला जाऊ शकतो असे देखील मत व्यक्त होत आहे.
10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तत्पूर्वी मात्र शेतकऱ्यांकडून जर केवायसी केलेली नसेल तर पीएम किसानसा पुढील पंधरावा हफ्ता त्यांना मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ई-केवायसी केली नाही तर का 15वा हफ्ता मिळणार ?
खरंतर, मध्यंतरी पीएम किसान योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. याचा अर्थ आता या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळणार आहे ज्यांनी केवायसी आणि जमीन पडताळणी केली आहे. केंद्राने जुलैमध्ये 14 वा हप्ता जारी केला होता.
ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांना हा हप्ताही मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेचा पुढील पंधरावा हफ्ता देखील जे शेतकरी केवायसीची प्रक्रिया करतील, जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करतील सोबतच आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करतील अशाच शेतकऱ्यांना दिला जाणार असे सांगितले जात आहे.
कशी करणार ई-केवायसी प्रक्रिया ?
शेतकरी मित्रांनो, ई केवायसी ची प्रक्रिया तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून करू शकणार आहात. किंवा तुम्ही तुमच्याजवळ कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच आपले सेवा केंद्रावर भेट देऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. दरम्यान आता आपण मोबाईलवरून केवायसीची प्रक्रिया कशी करायची हे जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या (Pm Kisan Website) च्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे होम पेजवर ‘फार्मर्स कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘eKYC’ वर क्लिक करावे लागेल. मग तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. यानंतर आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. OTP यशस्वीरित्या प्रविष्ट केल्यानंतर, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.