Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याचं काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट दरम्यान विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या या दोन विस्तारित मेट्रोमार्गांना प्रवाशांनी देखील भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. या मेट्रो मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. वास्तविक या दोन्ही मेट्रो मार्गांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.
पण यापैकी वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो मार्गावरील मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान आता या मार्गावरील मेट्रो प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मार्गावरील मेट्रो प्रवाशांना आता पुणे रेल्वे स्थानकावरच तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पुणे रेल्वे स्थानक हे या मार्गाचे एक महत्त्वाचे स्थानक आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकावर मेट्रो तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी तिकीट काउंटर सुरू केले जाणार असून यासाठीच्या जागेची सध्या पाहणी केली जात आहे. विशेष म्हणजे या तिकीट काउंटरवर मेट्रोचे तसेच रेल्वेचे जनरल तिकीट देखील मिळणार आहे.
यासाठी मेट्रोचे अधिकारी व रेल्वेचे अधिकारी लवकरच पुणे रेल्वे स्थानक येथे जागेची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेट्रोमधून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे जनरल तिकीट आणि मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावरच मेट्रो तिकीट उपलब्ध होणार आहे.
साहजिकच या निर्णयाचा मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रामदास भिसे यांनी देखील याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भिसे यांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे आणि मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी सोय उपलब्ध होणार आहे.
यासाठी तिकीट खिडक्या उघडण्यासाठी पुणे रेल्वे विभाग आणि पुणे मेट्रो यांच्यात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जागेसाठी दोन्ही विभाग लवकरच एकत्रित पाहणी करणार आणि त्यानंतर मग तिकीट खिडक्यासाठी स्थळ निश्चित केले जाणार अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.