Pune Mhada News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पुणे मंडळाच्या घरांसाठीच्या लॉटरीची वाट पाहिली जात होती ती लॉटरी अखेरकार जाहीर करण्यात आली आहे. काल अर्थातच 5 सप्टेंबर 2023 रोजी पुणे मंडळाच्या 5863 घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागातील घरांचा या लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सोडतीसाठी कालपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खरंतर मार्च महिन्यात पुणे मंडळांने 5000 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यावेळी हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले होते.
मात्र ज्या लोकांना गेल्या लॉटरीत घरांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही त्या लोकांकडून पुणे मंडळाची आगामी लॉटरी केव्हा निघणार हा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सोडतिला मुहूर्त लाभला आहे. पुणे मंडळांनी 5863 घरांसाठी लॉटरी जाहीर केली असून यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या लॉटरीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली माळुंगे येथील घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या पुणे मंडळाच्या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या भागात किती घरे?
पुणे मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या सोडती मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये 5425 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सोलापूर 69, सांगली 32 आणि कोल्हापूर येथे 337 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. म्हणजेच या सोडतीत एकूण 5,863 घरांचा समावेश करण्यात आला आहे.
यात म्हाडा गृहनिर्माण योजनेची 403 घरे, प्रधानमंत्री आवास योजनेची 431 घरे, 20 टक्के योजनेची 2584 घरे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 घरांचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे मंडळाच्या सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे
अर्ज विक्री आणि स्वीकृती केव्हा : जाहिरात निघाल्यानंतर लगेच या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु झाली आहे. काल दुपारी बारा वाजेपासून यासाठी नोंदणी सुरू झाली असून ही नोंदणी 26 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच 27 सप्टेंबर 2023 रात्री 11:59 पर्यंत या घरांसाठी अर्ज सादर करता येणार आहे.
अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : सहा सप्टेंबर दुपारी बारा वाजेपासून ते 28 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरता येणार आहे. तसेच आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे 29 सप्टेंबर पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.
प्रारूप यादी केव्हा जाहीर होणार : या घरांसाठीची प्रारूप यादी 9 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
ऑनलाइन दावे आणि हरकती केव्हा सादर करता येणार : प्रारूप यादीमध्ये समाविष्ट न झालेल्या अर्जदारांना 12 ऑक्टोबर 2023 दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाईन दावे आणि हरकती सादर करता येणार आहेत.
अंतिम यादी केव्हा जाहीर होणार : अर्जदारांचे दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर 16 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
लॉटरी केव्हा निघणार : या सोडतीची लॉटरी म्हाडा पुणे मंडळाच्या कार्यालयात काढली जाणार आहे. ही लॉटरी 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता काढले जाणार अशी माहिती समोर आली आहे.