Pune Mumbai Expressway : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दैनंदिन कामानिमित्त या दोन्ही शहरादरम्यान हजारो नागरिक प्रवास करत असतात. विशेष म्हणजे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत.
यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर निघत असतात. अशा परिस्थितीत सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान एक्सप्रेस वे वर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. खरे तर एक्सप्रेस वे वर नेहमीच लॉंग वीकेंड आला तर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
तसेच उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की दरवर्षी यां मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. यंदा देखील तशीच गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, उन्हाळीच्या सुट्ट्या आणि लॉन्ग विकेंड पाहता महामार्ग पोलिसांनी चालक आणि मालक संघटनांना एक अतिशय महत्त्वाचे आवाहन केले आहे.
महामार्ग पोलिसांनी चालक आणि मालक संघटनांना 9 एप्रिल 2024 पर्यंत सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवास करणे टाळावे असे म्हटले आहे. महामार्ग पोलीस नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियमनासाठी प्रयत्नशील असते.
गेल्या वर्षीच्या अनुभवावरून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जर लॉन्ग वीकेंड आला तर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाट हद्दीत घाट सेक्शन आणि मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि एन. एच ४८ असा संयुक्तीक महामार्ग एकत्र येत असल्याने लाँग विकेन्डला वाहनांचं प्रमाण अधिक होऊन या मार्गांवर वाहतूक संथ गतीने चालत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
याच पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन चालक-मालक संघटना यांना 9 एप्रिल पर्यंत सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
असे केल्यास त्यांना घाट सेक्शन मध्ये थांबावे लागणार नाही असा दावा पोलिसांनी केलेला आहे. तसेच, या कालावधीत जर अवजड वाहने रस्त्यावर आली नाही तर वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे, वाहन गरम होऊन बंद पडणे इत्यादी घटना टळू शकतील असे पोलिसांनी म्हटले आहे.
यामुळे प्रवाशांच्या इंधन आणि वेळेचीही बचत होईल. याशिवाय, कार चालकांनी घाट सेक्शनमध्ये वाहतूक संथ गतीने चालू असताना ओ.सी. चा वापर करू नये, जेणेकरून वाहनाच्या क्लच प्लेटवर लोड येऊन वाहन बंद पडणार नाही, अशा सूचना यावेळी पोलिसांनी निर्गमित केलेल्या आहेत.