Pune New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पुर्ण झाली आहेत. अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. सध्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 625 किलोमीटर लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू झाली आहे.
उर्वरित 76 किलोमीटरचे काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. जुलै 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि यामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गाने करता येणार आहे.
याव्यतिरिक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम, जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचे काम आणि विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे.
शिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान देखील ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित केला जाणार आहे. हा मार्ग अहिल्यानगर वरून जाणार आहे. यामुळे पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजी नगर हा प्रवास गतिमान होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे ते छत्रपती संभाजी नगर या महामार्गाबाबत एक अपडेट समोर आले होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी नुकताच सामंजस्य करार पूर्ण झाला आहे.
हा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यात झाला आहे. अर्थातच या प्रकल्पासाठीचे एक महत्त्वाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकसित करणार असल्याने या दोन्ही विभागांमध्ये हा महत्त्वाचा करार झाला आहे. यामुळे याचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान तयार होत असलेल्या या नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे मुळे फक्त या दोन शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार नसून पुणे ते नागपूर हा प्रवास देखील सोयीचा होणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास चार तासात आणि पुढे छत्रपती संभाजीनगर वरून समृद्धी महामार्गाने नागपूर पर्यंतचा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
यामुळे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे तीन विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असे बोलले जात आहे.