Pune News : पुणेकरांसाठी आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला वनाजी ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट यादरम्यान मेट्रो वाहतूक सुरू आहे.
विशेष म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून आगामी काही महिन्यात हा देखील मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन महामेट्रोचे आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या मेट्रोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
दरम्यान, आता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या विस्तारित मेट्रो मार्गांना राज्य शासनाकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी सक्षम होईल आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार अशी आशा आहे.
पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान याच प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
कसे राहणार रूट ?
हाती आलेल्या माहितीनुसार, वनाज ते चांदणी चौक हा १.१२ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहणार आहे. या मार्गिकेवर २ स्थानके तयार केली जाणार आहेत.
तसेच, रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) हा ११.६३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहणार आहे. यावर ११ स्थानके तयार केली जाणार अशी माहिती समोर आली आहे.
या दोन्ही विस्तारित मेट्रोमार्ग अंतर्गत एकूण १२.७५ कि.मी. लांबीचा मार्ग आणि १३ उन्नत स्थानके तयार केले जातील. यासाठी ३ हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे पूर्णतः उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प राहणार आहेत.
दरम्यान याच विस्तारित मेट्रो मार्गांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
या नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गांमुळे उपनगरातील नागरिकांना आता भविष्यात जलद गतीने शहरात पोहोचता येणार आहे. यामुळे पुणे आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम होईल अशी आशा व्यक्त होत आहे.