Pune News : येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा पर्व मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील चौकापासून ते लाल किल्ल्यापर्यंत सर्वत्र भारत मातेचा तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.
विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सालाबादाप्रमाणे राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर देखील ध्वजारोहणासोबतच विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दरम्यान या स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ढेकळवाडी येथील अशोक सुदाम घुले आणि मंगल सुदाम घुले या शेतकरी दांपत्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मान होणार आहे. खरंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दोन भाग्यवान लाभार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
यासाठी दोन शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन लाभार्थ्यांमध्ये ढेकळवाडी येथील घुले दाम्पत्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची या सन्मानासाठी निवड झाली आहे. या शेतकरी दांपत्याला दिल्लीत स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे.
घुले यांच्याकडे दीड एकर जमीन आहे. अल्पभूधारक शेतकरी म्हणून त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून त्यांना शेती करताना हातभार लागत आहे. घुले शेती कमी असल्याने पशुपालन हा व्यवसाय करतात. त्यांना पशुपालन व्यवसायातून चांगली कमाई देखील होत आहे.
काय आहे पीएम किसान योजना
ही योजना मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.