Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध रस्ते विकास पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये पुणे रिंग रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पूर्ण करणार असून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
यासोबतच हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी देखील अति महत्त्वाचा बनला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच पुणे रिंग रोड बाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रिया बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
वास्तविक हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी भूसंपादन प्रक्रियेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यानुसार या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या असून संमतीकरार करून संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या 14 शेतकऱ्यांच्या जमिनी संमतीकरारनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान या 14 शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते मोबदला देण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या कोणत्या गावातील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे आणि किती मोबदला जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आला आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना किती मोबदला मिळाला?
हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पुणे रिंग रोड मध्ये बाधित 14 शेतकऱ्यांनी समतीकरारनाम्याद्वारे आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या आहेत. या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 13 कोटी 82 लाख 90 हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पश्चिम भागातील पुणे रिंग रोडचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. पश्चिम पुणे रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
नोटीसा बजावल्यानंतर हवेली तालुक्यातील कल्याण गावातील एकाच कुटुंबातील ९ शेतकरी, मावळ तालुक्यातील ऊर्से गावातील दोन शेतकरी, पाचाणे गावातील एक शेतकरी, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील दोन शेतकरी अशा 14 शेतकऱ्यांना त्यांच्या ३ हेक्टर १७ आर संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात १३ कोटी ८२ लाख ९० हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत.
यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी शासनाच्या महत्त्वकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी मोबदल्याची रक्कम पारदर्शक व वाजवी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच भूसंपादनाची ही सर्व प्रक्रिया सर्व खातेदारांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेत अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी महोदय यांनी जमीन देणाऱ्यांना प्रचलित दरापेक्षा कमी मोबदला मिळणार नाही याकडे विशेष लक्ष दिले असल्याचे यावेळी नमूद केले. एवढेच नाही तर संमती करारनाम्याद्वारे ज्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन देऊ केली आहे त्यांना मोबदल्याच्या २५ टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला दिला जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
दरम्यान पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी आत्तापर्यंत शासनाने सुमारे १ हजार कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील यावेळी दिली आहे. यामुळे संमती करारनामे करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देणे जिल्हा प्रशासनाला शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापुढे देखील भूसंपादनासाठी शासनाकडून गरजेनुसार मोबदल्याची रक्कम प्राप्त होईल असे त्यांनी नमूद केले आहे.