Pune Ring Road : पुणे रिंग रोड हा एक राज्यातील महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प फक्त पुणे शहरासाठीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. खरंतर हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे.
यामुळे या दोन्ही शहरांमधील वाहतूक कोंडी फुटणार आहे शिवाय कृषी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा राहणार आहे. याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे.
सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम केले जात असून भूसंपादनासाठी प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकल्पासाठी 28 इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी टेंडर मध्ये बोली लावण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. या कंपन्यांनी बोली लावण्यासाठी अर्ज सादर केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पूर्व रिंग रोड जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांमधून जाणार आहे. तसेच पश्चिम रिंगरोड हा भोर तालुक्यात पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी या बाधित गावांमधील 695 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यानुसार पूर्व आणि पश्चिम रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या बहुतांशी गावातील जमीन फेरमूल्यांकनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यात मावळ आणि मुळशी तालुक्याने आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही तालुक्यातील 26 गावांमध्ये जमिनीचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
मूल्यांकन पूर्ण करताना बाधित जमीनदारांना विचारात घेतले गेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिननिहाय स्वातंत्र्य मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. यामुळे आता या दोन्ही तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
ती म्हणजे नोटीस प्राप्त झाल्यानंतर जे बाधित शेतकरी स्वतःहून जमीन देण्यास तयार होतील त्यांना मोबदल्यात 25 टक्के अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी मुदतीत संमती पत्र द्यावे असे आवाहन देखील केले जात आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रिंग रोड मधील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी बाधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित तलाठ्याकडे बाधित शेतकऱ्यांच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामुळे आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि या प्रकल्पाचे काम देखील लवकरच सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.