Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम असा झाला आहे की आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. उच्च शिक्षणानंतर आता तरुणांचा नोकरी करण्याकडेच अधिक कल आहे.
परंतु, राज्यातील काही उच्चशिक्षित तरुणांनी उच्चशिक्षणानंतर नोकरी ऐवजी शेतीला निवडले आहे. विशेष म्हणजे शेतीमधून अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आता चांगले उत्पन्न देखील मिळवून दाखवले आहे. धाराशिव जिल्ह्यातूनही असच एक कौतुकास्पद उदाहरण समोर येत आहे.
कळंब तालुक्यातील एका तरुणाने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ नोकरी केली आणि नोकरी सोडून शेतीकडे वळला आहे. विशेष म्हणजे शेतीमधून हा उच्चशिक्षित तरुण आता लाखो रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. हेच कारण आहे की कळंब तालुक्यात या युवकाची सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
श्रीकांत गोविंदराव भिसे राहणार एकुरका या तरुणाने ही किमया साधली आहे. श्रीकांत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील एका कंपनीत वार्षिक चार ते साडेचार लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सुरू केली.
नोकरी मधून वर्षाकाठी त्यांना लाखो रुपये मिळत होते मात्र मनाला समाधान नव्हतं. हेच कारण आहे की त्यांनी नोकरीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्या गावी परतले. गावी परतल्यानंतर त्यांनी शेती सुरू केली. शेती सुरू केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शेततळे बनवले. यासाठी त्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेतला.
सुरुवातीला त्यांनी ऊस, सोयाबीन, तूर यांसारख्या पिकांची शेती सुरू केली. मात्र त्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नव्हती. मग त्यांनी एका मित्राच्या सल्ल्याने कृषी विभागाशी संपर्क साधला. येथून खऱ्या अर्थाने त्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळू लागले. कृषी विभागाचा सल्ला त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
कृषी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला केळी, पपई, चेंडू, कलिंगड, टरबूज, काशीफळ, भोपळा, घेवडा,आणि तैवान पिंक पेरू याची एक हेक्टरवर लागवड केली. आज त्यांना फळबाग पिकांमधून उत्पादन मिळत आहे. त्यांची मेहनत आज फळाला आली आहे. तैवान पिंक पेरू आज तीन वर्षाचे झाले असून त्यांना एका हेक्टरमधून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
भिसे यांना फ़ळबाग लागवडीसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च आला आहे. पण यातून अंदाजे सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. निश्चितच श्रीकांत यांनी शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे यात शंकाच नाही.