Pune Traffic News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुण्यातील वाहतूकीसंदर्भात. पुण्याच्या काही भागातील वाहतूकित काही काळासाठी बदल होणार आहे. खरंतर, पुणे शहरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यामध्ये चांदणी चौक परिसरात देखील पुलाचे काम सुरू आहे.
दरम्यान, चांदणी चौक प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामांपैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या प्रकल्पाची जवळपास 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सध्या नवीन एनडीए-पाषाण मुख्य पुलाचे काम ‘सबस्ट्रक्चर’ पातळीपर्यंत झाले असून, ‘सुपरस्ट्रक्चर’चे काम प्रगतिपथावर आहे.
हे काम वेगात व्हावे यासाठी या भागातील वाहतूक बंद करावी लागणार आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतूकित काही काळासाठी बदल होणार आहे. चार जुलै अर्थातच आज पासून ते 15 जुलै पर्यंत मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन असा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त ‘मल्टिॲक्सेल’ वाहनांची वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कोणत्या वाहणांना राहणार बंदी
या काळात मल्टी एक्सेल वाहनांची वाहतूक रोखली जाणार आहे. ही वाहने एक्स्प्रेस-वेवरच थांबवले जातील असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. तसेच मुख्य महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचा वापर करू शकणार आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून सातारा/ कोथरूडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सर्व्हिस रोड आणि ‘रॅम्प’ सहाचा वापर करतील. यासोबतच सातारा आणि कोथरूडमार्गे (पुणे शहर) मुंबई आणि मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवनाच्या बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड आणि ‘रॅम्प’ आठचा वापर करू शकणार आहेत.
इतर वाहतुकीत मात्र कोणताही बदल झालेला नाही, याची नोंद प्रवाशांना घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निश्चितच थोडे दिवस या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार आहे. यामुळे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.