Rabbi Season : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील विविध भागात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस पिकाची आगात लागवड करण्यात आली होती अशा ठिकाणी कापूस आणि सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू देखील झाली आहे.
काही भागातील सोयाबीन आणि कापसाचे पीक विक्रीसाठी बाजारात आले आहे. दरम्यान आगामी काही दिवसात राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करतात. यामध्ये गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय असते.
याव्यतिरिक्त, रब्बी हंगामामध्ये वांगी या भाजीपाला वर्गीय पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. खरंतर वांग्याचे पिक तीनही हंगामात उत्पादित होते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात या पिकाची शेती केली जाते.
रब्बी किंवा उन्हाळी हंगामाचा विचार केला असता या हंगामासाठी वांग्याची रोपवाटिका सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तयार केली जाते आणि तयार झालेली रोपे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात लागवडीसाठी तयार होतात. दरम्यान आज आपण वांग्याच्या काही सुधारित जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वांग्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
मांजरी गोटा : महाराष्ट्रात उत्पादित होणारे हे एक महत्त्वाचे वाण आहे. या जातीची संपूर्ण महाराष्ट्रभर लागवड केली जाते. या जातीचे फळे खाण्यासाठी खूपच रुचकर आणि चविष्ट असतात. परिणामी बाजारात या जातीच्या फळांना मोठी मागणी असते आणि चांगला भावही मिळतो. या जातीची लागवड केल्यानंतर साधारणता 150 ते 170 दिवसात पीक परिपक्व बनते.
विशेष म्हणजे या जातीचे वांगे काढणी केल्यानंतर चार ते पाच दिवस टिकतात. यामुळे लांबच्या बाजारपेठात माल विक्रीसाठी पाठवायचा असेल तर या जातीचे वांगे फायदेशीर ठरतात. हेच कारण आहे की या जातीच्या वांग्याला महाराष्ट्रात मोठी प्रसिद्धी मिळत आहे. वांग्याची ही सुधारित जात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
वैशाली : राज्यात उत्पादित होणारी वांग्याची ही देखील एक सुधारित जात आहे. खरंतर या जातीचे पीक लवकर परिपक्व होते. मात्र गुणवत्ता ही साधारण असते. परंतु लवकर काढण्यासाठी तयार होत असल्याने आणि चांगले उत्पादन मिळत असल्याने या जातीच्या लागवडीस शेतकरी पसंती दाखवतात.
अनुराधा : अनुराधा ही वांग्याची जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लावली जाते. मांजरीगोटा व पुसा पर्पल क्लस्टर यांच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. या जातीपासून गोल, काटेरी, आकर्षक रंगाची लहान वांगी तयार होतात. बाजारात या जातीच्या वांग्याला देखील बऱ्यापैकी मागणी आहे. हा वाण पर्णगुच्छ व शेंडे अळीला कमी प्रमाणत बळी पडतो. यामुळे शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळते.