Samruddhi Mahamarg : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी. तसेच नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही भरते. खरतर राजधानी आणि उपराजधानी या दोन्ही कॅपिटल शहरांतुन दररोज हजारो नागरिक ये-जा करतात.
अशा स्थितीत नागपूरकरांना मुंबईत जाण्यासाठी विदर्भाचे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख प्राप्त असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची कल्पना मांडली होती. हा महामार्ग राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असल्याचे सांगितले जाते.
या महामार्गाचे आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक काम झाले आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले होते.
या मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा आहे. हा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी हा प्रवास गतिमान झाला आहे. विशेष बाब अशी की, या चालू वर्षी या महामार्गाचा दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात आला आहे.
शिर्डी ते इगतपुरी तालुक्याच्या भरवीर पर्यंतचा 80 किमीचा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. या टप्प्याचे 26 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम भरवीर पर्यंत पूर्ण झाले असून आता नागपूर ते भरवीर हा प्रवास गतिमान झाला आहे.
अशातच आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत या महामार्गाच्या कामाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. दादा भुसे यांनी हा मार्ग नेमका केव्हा बांधून पूर्ण होणार याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
भुसे यांनी हा मार्ग राज्याच्या विकासाचे चित्र बदलणारा असून मे 2024 मध्ये हा मार्ग मुंबईला जोडणार असल्याचे नमूद केले आहे. मुंबईच्या जेएनपीटी जवळ हा महामार्ग जोडला जाणार असून याचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होणार अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे.
हा मार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईच्या जवळ आणणारा महामार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भुसे यांनी या महामार्गावर 138 मेगावॉट वीज निर्मिती होणार असल्याचेही सांगितले, तसेच या महामार्गावर जवळपास 33 लाख झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. एकंदरीत डिसेंबर 2023 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगितले जात होते.
मात्र या मार्गाचे काम या चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. दस्तूरखुद्द एमएसआरडीसीचे मंत्री दादा भुसे यांनीचं या मार्गाचे काम 2024 मध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगितले असल्याने समृद्धीवरून नागपूर ते मुंबई हा थेट प्रवास करण्यासाठी आणखी दहा ते अकरा महिने म्हणजेच जवळपास एक वर्ष वाट पहावी लागणार आहे.