Snake Bite Interesting Fact : साप हा एक विषारी प्राणी आहे. सापाच्या चाव्याने दरवर्षी आपल्या देशात हजारो लोक आपला जीव गमावतात. यामुळे साप पाहिला की आपली पायाखालची जमीन सरकते. असा एकही व्यक्ती नाहीये जो की सापाला घाबरत नाही. मात्र असे असेल तरी आपल्या देशात आढळणारे बहुतांशी साप हे बिनविषारी आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती आहेत ज्या की विषारी आहेत.
मात्र असले तरी साप दिसला की त्यापासून दूर राहिलेले बरे. तुमच्या घरात किंवा परिसरात साप आढळला तर त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. सर्वप्रथम तुम्ही त्या सापापासून दूर राहा आणि सर्पमित्राला बोलावून तो साप रेस्क्यू करून त्याची जंगलात रवानगी करा.
अन्यथा सापाला पकडण्याच्या प्रयत्नात तुम्हाला देखील सर्पदंश होऊ शकतो. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58 हजाराहुन अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. मात्र सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना उन्हाळ्यात घडतात.
अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना उन्हाळ्यात साप का चावतात ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज आपण याच इंटरेस्टिंग प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यात साप चावण्याचे खरे कारण काय, याबाबत तज्ञांनी काय माहिती दिली आहे हे आता आपण पाहणार आहोत.
उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटना का बर वाढतात
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या घटना या एप्रिल ते ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या कालावधीत सर्वाधिक घडतात. विशेष म्हणजे सर्पदंशाच्या एकूण घटनेपैकी 80% घटना या ग्रामीण भागात पाहायला मिळतात.
उन्हाळ्यात दैनंदिन तापमानात प्रत्येक अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास साप चावण्याची शक्यता सुमारे 6% वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तज्ञ सांगतात की, साप हे थंड रक्ताचे प्राणी आहेत. याचा अर्थ ते स्वतःच्या शरीराचे तापमान राखू शकत नाहीत.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तापमान वाढलं की सापाचं शरीरही तापू लागते, ज्यामुळे अधिक तापमानात त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ते नेहमीच थंड जागेचा शोध घेत असतात. यामुळे ते बिळाबाहेर पडतात.
दुसरीकडे हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान कमी राहत असल्याने सापांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि याचा परिणाम म्हणून ते चयापचय क्रिया व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळे ते थंडीच्या दिवसात अधिक वेळ झोपा काढण्यात घालवतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये साप त्याच्या पूर्ण क्षमतेने धावू शकत नाही आणि शिकार देखील करू शकत नाही.
मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सापांना पुरेशी ऊर्जा मिळते. या दिवसात त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सापाची धावण्याची गती वाढते. यामुळे उन्हाळ्यात त्यांना शिकार करणे सोपे जाते.
हेच कारण आहे की या दिवसांमध्ये ते शिकाराच्या शोधात बिळाबाहेर पडतात. या काळात ते पुनरुत्पादन देखील करतात. शिवाय तापमानात जास्त वाढ झाली की त्यांचे शरीर तापत असल्याने ते थंड जागेच्या ठिकाणी मानवी वस्तीच्या आजूबाजूला येऊन लागतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना नमूद केल्या जातात.