Solar Panel Subsidy And Loan : अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. उन्हाळ्यात तर वीजबिल आणखी वाढते. यामुळे अनेकांनी आता वाढत्या वीजबिलाला कंटाळून सोलर पॅनल लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान जर तुम्हीही सोलर पॅनल इन्स्टॉल करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
खरे तर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी सर्वसामान्यांना 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना या योजनेअंतर्गत सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाते.
या अंतर्गत एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅट तथा तीन किलो वॅटपेक्षा जास्त परंतु दहा किलो वॅटपर्यंतच्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान तर दिलेच जात आहे शिवाय देशातील विविध बँका सोलर पॅनल साठी कर्ज देखील देत आहेत. पंजाब नॅशनल बँक ही सरकारी बँक देखील सोलर पॅनल साठी कर्ज देत आहे.
ही बँक सोलर रूफटॉप योजनेसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहे. बँकेने याबाबत आपल्या वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार, हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचा CIBIL स्कोर किमान 680 असणे आवश्यक आहे.
तसेच, या कर्जासाठी अर्जदाराकडे स्वतःची निवासी मालमत्ता म्हणजे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. जेणेकरून घराच्या छतावर सोलर सिस्टीम बसवता येईल. या कर्जासाठी अर्जदाराचे कमाल वय 75 वर्षे असावे.
किती कर्ज मिळणार
हे कर्ज जास्तीत जास्त 10 किलोवॅट क्षमतेचे नवीन रूफटॉप सोलर पॉवर सिस्टम बसवण्यासाठी दिले जात आहे. रुफटॉप सोलर पॉवर सिस्टमच्या क्षमतेनुसार कर्जाची कमाल रक्कम 6 लाख रुपये आहे.
3 किलोवॅटपर्यंत रूफटॉप सोलर पॉवर सिस्टीम बसविण्यासाठी 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे. या कर्जासाठी दिलेल्या कर्जासाठी परतफेड कालावधी 10 वर्षे एवढा ठेवण्यात आला आहे.
हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज आणि मंजुरी पत्र, एक वर्षाचा आयटीआर, मागील 6 महिन्यांचे खाते विवरण, वीज बिल, मालमत्तेच्या मालकीचे कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे.