शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! सोयाबीन बाजारभावात दोनशे रुपयांची घसरण, सध्या पिवळ्या सोन्याला काय भाव मिळतोय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होऊन आता जवळपास एक ते दीड महिन्यांचा काळ उलटला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होती आणि ज्या ठिकाणी मान्सून मध्ये चांगला पाऊस झाला होता अशा ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

आता रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू, हरभरा या पिकांना वाढत्या थंडीचा फायदा देखील मिळत आहे. यामुळे निदान रब्बी हंगामातून तरी बऱ्यापैकी उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

मात्र बाजारात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कापसाला तर काल पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळाला.

सोयाबीनच्या बाबतीतही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनचे दर बाजारात हमीभावाच्या आसपास आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या पंधरा दिवसांचा विचार केला असता गत पंधरा दिवसांमध्ये राज्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळं सोन म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन दरात दीडशे ते अडीचशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता शेती करायची कशी हा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात राज्यात खूपच कमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण दरवर्षी पेक्षा कमीच होते.

त्यामुळे सोयाबीन, कापूस, ऊस यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. उत्पादन कमी आले असल्याने निदान बाजार भाव तरी बरा मिळेल आणि उत्पादनात आलेली घट वाढीव बाजार भावाने भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.

पण आता सोयाबीन बाजारात दाखल होऊन जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटला आहे. पण तरीही मालाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे सांगितले जात आहे. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 13,893 क्विंटल सोयाबीन आवक झाली.

आजच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4850 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. म्हणजेच सरासरी बाजारभाव हे 5000 रुपयांपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. 

Leave a Comment