Soybean Farming : सोयाबीन म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते मराठवाडा आणि विदर्भातील चित्र. कारण की मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या विभागात घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या बळावर महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्यां क्रमांकावर विराजमान आहे. राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते.
प्रथम क्रमांकावर मध्यप्रदेश या राज्याचा नंबर लागतो त्या ठिकाणी 45 टक्के उत्पादन घेतले जाते. एकंदरीत राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र खूपच अधिक आहे. शेतकऱ्यांचा या पिकावर मदार आहे. मात्र अलीकडील काही काळात सोयाबीन उत्पादकता कमी होत चालली आहे.
प्रामुख्याने राज्यातील सोयाबीन उत्पादकतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यामागे विविध कारणे आहेत. यात नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पिक उत्पादकता कमी झाली आहे. तसेच काही छोट्या मोठ्या चुका शेतकऱ्यांकडून होत आहेत त्यामुळे देखील उत्पादकता कमी होत आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी तज्ञांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आणि अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. तज्ञ लोकांनी शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजोप्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आज आपण बीजोपचार किंवा बीजप्रक्रिया कोणत्या औषधाने करावी यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
बिजोप्रक्रिया करण्यासाठी कोणते औषध वापरणार ?
- कार्बॉक्सिन 37.5 टक्के, थिरम 37.5 टक्के, 2 ग्रॅम/कि.ग्रा. बियाणे किंवा थायोफेनेट मिथाइल, पायराक्लोस्ट्रोबिन (५० एफएस), १.५ मिली/कि.ग्रा. बियाण्याच्या दराने बीजप्रक्रिया करावी.
- पेनफ्लुफेन 13.28%, ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 13.28% 1 मिली प्रति किलो बियाणे या दराने बीजप्रक्रिया करा.
- किंवा ट्रायकोडर्मा हार्जिअनमची 5 ग्रॅम सेंद्रिय बुरशीनाशकाची प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया केली जाऊ शकते, यामुळे बियाणे आणि मातीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवता येते.
- जेथे स्टेम फ्लाय, पांढरी माशी आणि पिवळ्या मोज़ेकचा त्रास जास्त असतो. अशा भागात पेरणी करत असाल तर थायामेथोक्सम 70 डब्ल्यूएस नावाच्या कीटकनाशकाने 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यांवर बीजप्रक्रिया करायला पाहिजे.
- बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या उपचारानंतर, 5-10 ग्रॅम ब्रॅडीरायझोबियम कल्चर आणि 5-10 ग्रॅम P.S.B. कल्चरसह प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी आणि मग पेरणी करावी.