Soybean Market 2023 : दिवाळीचा सण मात्र बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता पैशांची निकड भासू लागली आहे. सणासुदीचा हंगाम जवळ आला असल्याने शेतकरी बांधव या चालू हंगामातील सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन हंगामातील सोयाबीन आणि कापूस बाजारभाव मात्र अजूनही दबातच आहेत. वास्तविक, सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारी एक मुख्य नगदी पीक आहे.
या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. पण सध्या सोयाबीनला बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. कालच्या लिलावात मात्र सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या लीलावात देखील सोयाबीन दरात वाढ नमूद करण्यात आली होती. म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीन दरात सुधारणा होत आहे.
खरंतर यंदा मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात 88 टक्के एवढा पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरी पेक्षा 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती तयार झाली असून या दुष्काळी जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी खूपच निराशाजनक ठरली आहे. कारण की आत्तापर्यंत राज्यातील बहुतांशी बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे.
पण कालच्या लिलावात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनच्या कमाल आणि सरासरी बाजारभावाने 5000 रुपयाचा विक्रमी टप्पा पार केला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु बाजारभाव आणखी वाढले पाहिजेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रिसोडमध्ये सोयाबीनला काय भाव मिळाला
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल 31 ऑक्टोबर 2023 रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3250 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजारात काल सोयाबीनला किमान चार हजार 770, कमाल 5205 आणि सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.