Soybean Market : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे. खरं तर यावर्षी महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
शिवाय मध्यंतरी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. परिणामी सोयाबीनचे उत्पादन यंदा विक्रमी घटणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान यावर्षी विविध संकटांना तोंड देत उत्पादकांनी सोयाबीनचे उत्पादन पदरात पाडले आहे.
काही ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे तर काही ठिकाणी सोयाबीनची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून मार्केटमध्ये नवीन माल दाखल झाला आहे. मात्र नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सध्या मार्केटमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आगात सोयाबीनची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा माल दाखल झाला आहे.
याचाच अर्थ नवीन मालाची आवक खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी नवीन सोयाबीन मार्केटमध्ये आल्यानंतर बाजारभावात थोडीशी घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे नैसर्गिक संकटांचा सामना करत बहु कष्टाने उत्पादित केलेल्या सोयाबीनच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा अधिकचा खर्च करून सोयाबीनचे पीक पदरात पाडून घेतले आहे. पण नवीन सोयाबीन मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतरच सोयाबीनचे बाजार भाव 400 रुपयांपर्यंत घसरले आहेत. मंगळवारी अर्थातच 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लिलावात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मात्र 4300 चा भाव मिळाला आहे.
तत्पूर्वी 30 सप्टेंबर 2023 रोजी अमरावती एपीएमसी मध्ये सोयाबीन तब्बल 4600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकले जात होते. परंतु नवीन सोयाबीनची आवक होताच बाजारभावात घसरण झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
परंतु काही बाजार अभ्यासकांनी यावर्षी भारत, अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये उत्पादन घटणार असा दावा केला असून याचा परिणाम म्हणून आगामी काही महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येऊ शकते असा अंदाज बांधला आहे.
मात्र उत्पादनाबाबत आत्तापासूनच अंदाज बांधणे थोडे घाईचे होऊ शकते यामुळे भविष्यात सोयाबीनला काय भाव मिळतो हे प्रत्यक्षात किती उत्पादन होते यावरच अवलंबून राहणार आहे.