Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन बाजारभावात दोन आठवड्यात तब्बल तीनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात गेल्या एका महिन्यांच्या काळात एक मोठी घडामोड झाली आहे. जागतिक बाजारात सोया पेंडचे भाव तब्बल 20 टक्क्यांनी वाढले आहेत. याचा परिणाम असा झाला की भारतीय सोया पेंडला मागणी वाढली आहे.
खरंतर अमेरिकन सोयापेंड पेक्षा भारतीय सोयापेंड आजही महागच आहे. पण आशिया खंडातील देशांना भारतीय सोयापेंड अमेरिकेच्या सोया पेंड पेक्षा स्वस्त पडत आहे. यामुळे भारतीय मालाची मागणी वाढलेली आहे.
हेच कारण आहे की देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात गेल्या दोन आठवड्यापासून सुधारणार पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे बाजार भाव आता 4600 ते 4800 एवढ्या सरासरी भाव पातळीवर येऊन ठेपले आहेत.
पण दोन आठवड्यापूर्वी हेच बाजार भाव 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढे होते. खरंतर ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. दुष्काळामुळे तेथील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागांमध्ये उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आहे.
हेच कारण आहे की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात गेल्या एका महिन्यात 10 टक्क्यांची आणि सोया पेंडच्या दरात 20 टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे देशाअंतर्गत सोयाबीन बाजारभावात सुधारणा झाली आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात सोया पेंड बाजारभावात जागतिक बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात ही दर वाढ झाली तर भारतीय सोया पेंडचे भाव आणखी वधारणार आहेत.
त्यामुळे देशांतर्गत प्रक्रिया प्लांट्स मध्ये सोयाबीनची मागणी वाढणार आहे. यंदा देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी झाले आहे यामुळे उद्योगांना आता सोयाबीनची खरेदी देखील वाढवावी लागणार आहे.
उद्योगांना आता चढ्या भावात माल खरेदी करावा लागणार आहे. म्हणून सोयाबीन बाजारभावात 500 ते 700 रुपयांपर्यंतची सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे.
येत्या दोन महिन्यात सोयाबीनचे भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल या सरासरी भाव पातळीवर पोहोचतील असा अंदाज काही बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे.