Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. तात्काळ पैसा मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. सोयाबीनला येलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून देखील ओळखतात. नेहमीच शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा अधिक मदार असतो.
हेच कारण आहे की गेल्या वर्षी चांगला भाव मिळाला नसतानाही यंदा विक्रमी क्षेत्रावर सोयाबीन लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने सोयाबीन पिकावर याचा विपरीत परिणाम झाला आहे आणि उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ची लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा माल आता तयार झाला असून विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे. एकंदरीत सोयाबीनचा नवीन हंगाम आता सुरू झाला आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
दरम्यान जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. या अशा कवडीमोल दरात शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान काही व्यापाऱ्यांनी भविष्यात सोयाबीन बाजारभावात वाढ होऊ शकते असा अंदाज बांधला आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन अमेरिका, ब्राझील, चीन आणि भारत या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये घटणार आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोयाबीनचा शॉर्टेज तयार होईल आणि हे कारण सोयाबीन दर वाढीसाठी पूरक ठरेल.
3 ऑक्टोबरच्या बाजारात जालनामध्ये सोयाबीनला हा भाव मिळाला
जालना एपीएमसी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी या बाजारात 100 ते 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यामध्ये जे नवीन सोयाबीन आहे त्या सोयाबीनला चार हजार ते चार हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.
नवीन सोयाबीन मध्ये आद्रता अधिक असल्याने भाव कमी मिळाला असल्याचे बोलले जात आहे. परंतु जे जुने सोयाबीन आहे त्या सोयाबीनला या मार्केटमध्ये 4500 ते 4700 दरम्यान भाव मिळाला आहे.
सध्याचा बाजारभाव परवडणार का?
शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेला भाव त्यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत परवडणार नाही. उत्पादन जास्त मिळाले तरी देखील हा भाव परवडणार नाही. यंदा तर उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे अशा स्थितीत भविष्यातही असाच भाव मिळाला तर यावर्षी पदरमोड करून सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च फेडावा लागणार आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतील असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
भविष्यात भाव वाढणार का?
भविष्यात सोयाबीनचे भाव वाढणार का आणि वाढणार तर किती वाढणार ? याबाबत व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली असता काही व्यापाऱ्यांनी भविष्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो असे मत व्यक्त केले आहे. पण, सोयाबीनच्या बाजारभावात तेव्हाच वाढ होणार जेव्हा केंद्र शासन सोयाबीन दराबाबत योग्य धोरण स्वीकारेल.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ज्यावेळी केंद्र शासन सोयातेल आयातीसाठी आयात शुल्क लावेल तेव्हाच सोयाबीनचे बाजार भाव वाढू शकतात असे सांगितले आहे. सोयातेल आयात करण्यासाठी आयात शुल्क लावले तरच भविष्यात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल नाहीतर अशाच कवडीमोल भावात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावा लागू शकतो असे मत काही व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात किमान सहा ते सात हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे अशी भोळीभाबडी आशा व्यक्त केली आहे. यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे चांगला विक्रमी दर मिळतो का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.