ST Passengers : महाराष्ट्रात लालपरीतून अर्थातच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. सर्वसामान्यांसाठी लालपरी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज जवळपास 25 लाखाहून अधिक नागरिक एसटीने प्रवास करतात.
विशेष म्हणजे राज्य शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास जाहीर केल्यानंतर आणि महिलांना तिकीट दरात 50% सवलत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लाल परीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
यामुळे कोरोना काळापासून डबघाईला आलेले एसटी महामंडळ पुन्हा एकदा नवीन उभारी घेऊ लागले आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात तर वाढ झालीच आहे, शिवाय राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आणि महिला प्रवाशांना स्वस्त प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक करत आहेत. सर्वत्र या निर्णयाची वाहवा होत आहे. ज्याप्रमाणे राज्य शासन एसटी प्रवाशांसाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे तसाच एक निर्णय एसटी महामंडळाने देखील घेतलेला आहे.
या निर्णयानुसार एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान मात्र 30 रुपयात नाश्ता आणि चहा उपलब्ध होतो. खरंतर हा आत्ता घेतलेला निर्णय नाही हा एक खूप जुना निर्णय आहे.
मात्र या एसटी महामंडळाच्या योजनेची अनेकांना माहिती नाहीये. यामुळे आज आपण एसटी प्रवाशांसाठी सुरू असलेली ही 30 रुपयात चहा नाश्त्याची योजना समजून घेणार आहोत.
काय आहे योजना
जर तुम्ही एसटी महामंडळाच्या एसटी बसने प्रवास केला असेल तर तुम्ही बस सकाळ, दुपार व संध्याकाळी काही ठरावीक हॉटेलवर थांबत असल्याचे पाहिले असेलच. खर तर एसटी चालक अशाच हॉटेलवर गाडी थांबवतात जी महामंडळाकडून नियुक्त केलेली असते.
विशेष म्हणजे या हॉटेलवर गाडी थांबवण्याचे कारण असे की एसटी मधील प्रवाशांना अशा संबंधित हॉटेलमध्ये फक्त 30 रुपयात चहा आणि नाश्ता उपलब्ध होतो. यासाठी मात्र लालपरी मधल्या प्रवाशांना तिकीट दाखवावे लागते.
मात्र अनेक प्रवाशांना या योजनेबाबत माहिती नाही. जर संबंधित हॉटेल चालकाने एसटी प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा आणि नाश्ता दिला नाही तर प्रवाशी थेट महामंडळाकडे याची तक्रार करू शकतात.
परंतु या संबंधित हॉटेलमध्ये नाश्त्याच्या वेळीच सवलतीच्या दरात नाश्ता मिळणार आहे. इतर कोणत्याही वेळेत ही सवलत लागू राहणार नाही.