State Employee DA Hike : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील एसटी महामंडळातील कामगारांसंदर्भात आहे. शिंदे सरकारने 4 ऑक्टोबर 2023 रोजी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्यातील जवळपास 17 लाख शासकीय नोकरदार वर्गाला जानेवारी महिन्यापासून 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला.
विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासन आणखी चार टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा विजयादशमीच्या सुमारास करण्याची शक्यता आहे. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 46 टक्के होणार आहे. यानंतर राज्य शासकीय सेवेत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जाणार आहे. खरंतर एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता दिला पाहिजे हा निर्णय याआधीच झाला आहे.
पण एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे डीए वाढीचा लाभ मिळत नव्हता. यामुळे एसटी कामगार संघटनेने महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळावा यासाठी मागणी लावून धरली होती. यासाठी 11 सप्टेंबर 2023 रोजी उपोषण देखील करण्यात आले होते.
दरम्यान सणासुदीचा हंगाम पाहता राज्य शासनाने त्वरित या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनेचे प्रश्न ऐकून घेतलेत. आणि मुख्यमंत्री शिंदे यांना एसटी कामगार संघटनेच्या मागण्या बाबत कळवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगार संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यात.
यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता देण्याचा निर्णय झाला. दरम्यान बुधवारी अर्थातच 4 ऑक्टोबर 2023 रोजी या निर्णयास अंतिम मान्यता देण्यात आली. अर्थातच आता एसटी कर्मचाऱ्यांना देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
याची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापासून होणार आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जे वेतन मिळेल त्यासोबत या वाढीव DA चा लाभ मिळणार आहे. यामुळे सदर कामगारांना ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट मिळाली असल्याचे मत व्यक्त होत आहे.