State Employee News : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा नुकताच मार्च महिन्याचा पगार झाला आहे. दरम्यान, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार म्हणून अवघा एक रुपया देण्यात आला आहे. खरंतर या चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण येत आहे. अशा परिस्थितीत या सदर कर्मचाऱ्यांना अवघा एक रुपयाचा पगार देण्यात आला असल्याने त्यांची मोठी कोंडी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या 9000 कार्यरत कर्मचाऱ्यांचा तथा सोळा हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार म्हणून अवघा एक रुपया देण्यात आला आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
मात्र या कर्मचाऱ्यांना फक्त एक रुपया पगार देण्याचे नेमके कारण काय ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासनाच्या नियमानुसार आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य होते.
मात्र या सदर कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केले नाही. यामुळे या सदर कर्मचाऱ्यांना तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार आणि निवृत्ती वेतन म्हणून अवघा एक रुपया देण्यात आला आहे.
उर्वरित संपूर्ण रक्कम कपात करण्यात आली आहे. केंद्र शासनाने जून 2023 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. यानुसार महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. ऑक्टोबर 2023 पर्यंत सूचना देऊनही, याबाबतचे परिपत्रक जारी करूनही, महापालिकेतील हजारो कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आधार आणि पॅन कार्ड हे एकमेकांशी जोडलेले नव्हते.
त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या पगारातून तसेच निवृत्ती वेतनातून २० टक्के दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. आता मार्च अखेरपर्यंत ही प्रक्रिया न झाल्याने अखेर या सर्व कार्यरत अन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ एक रुपया एवढी वेतनाची रक्कम देत उर्वरीत रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या सर्व कर्मचाऱ्यांनी आधार व पॅन कार्ड लिंक केल्यास, आयकर परताव्याची प्रक्रिया पूर्ण केल्यास ही सर्व रक्कम त्यांना परत मिळू शकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, जोवर आधार अन पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले जात नाही तोपर्यंत २० टक्के एवढी रक्कम कापून घेतली जाणार आहे.
मात्र हे दोन्ही कार्ड लिंक केल्यास त्यांच्या मासिक वेतनातून दहा टक्के एवढीच रक्कम कापून घेतली जाणार असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तथापि या निर्णयाचा सदर कर्मचाऱ्यांना तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठा फटका बसणार आहे.
येत्या तीन दिवसांनी गुढीपाडव्याचा सण येणार आहे आणि अशातच या सदर कर्मचाऱ्यांचा पगार कापला गेला असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन यावेळी केले आहे. त्यामुळे ज्यांनी हे काम अजून पूर्ण केलेले नसेल त्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर हे आवश्यक काम पूर्ण करायला हवे.