Successful Farmer Maharashtra : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये वेगवेगळ्या संकटांशी रोजच कुस्ती खेळावी लागत आहे. मराठवाडा म्हटलं की सर्व्यात आधी आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाच चित्र.
येथील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत, राब-राब राबत शेती करत आहेत. गेली तीन वर्ष मराठवाड्यात जरी चांगला पाऊस झालेला असला तरी देखील जालना जिल्हा आजही दुष्काळी जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ अशी बसलीय की अनेकदा शेतीमधून शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरेल एवढेही उत्पन्न मिळत नाही.
पण, या भीषण परिस्थितीवरही शेतकरी मात करतो. एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली की येथील शेतकरी भरगच्च उत्पादन मिळवतो. मात्र, अपार कष्ट घेऊन उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. अशा स्थितीत शेतकरी निराश होतो.
अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील काळ्या आईची सेवा करणं बळीराजा काही सोडत नाही. येथील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करतात आणि शेतीशी आपला इमान कायम ठेवतात. विशेष म्हणजे या नवख्या प्रयोगातून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम मराठवाड्यातील शेतकरी करतात.
दरम्यान जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये नवीन वाट स्वीकारत ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. केवळ एक एकर जमिनीत लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या बागेतून या शेतकऱ्याला पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत या प्रयोगाची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
जालना तालुक्यातील साळेगाव येथील शेतकरी विठ्ठल डीखुळे यांनी ही किमया साधली आहे. विठ्ठलरावांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. या पाच एकरा पैकी त्यांनी एका एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. ते सांगतात की, त्यांनी सर्वप्रथम ड्रॅगन फ्रुट सोलापूर येथे पाहिले.
यानंतर या फळाबाबत जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता लागली. या फळाच्या शेती बद्दल त्यांनी सर्व माहिती काढली. कोणत्या भागात हे फळपीक येत, या फळांमध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत, आपल्याकडे या फळाची लागवड होऊ शकते का? अशा सर्व गोष्टींची माहिती त्यांनी काढली.
यानंतर याची शेती करण्याचा निर्णय घेतला. याची लागवड करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या गावाजवळील एका ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्याकडून या फळाची पुन्हा एकदा माहिती घेतली. विशेष म्हणजे त्या प्रयोगशील शेतकऱ्याने देखील विठ्ठलराव यांना ड्रॅगन फ्रुट शेतीच्या सर्व बारीक सारीक गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांना ड्रॅगन फ्रुटची रोपेही दिली आणि लागवडीसाठी मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी त्यांना सल्ला दिला.
2020 मध्ये विठ्ठल रावांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. एक एकर क्षेत्रात बारा बाय सातच्या अंतराने याची लागवड करण्यात आली. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आवश्यक असलेले पोल, ठिबक सिंचन आणि रोपे असे एकूण तीन लाख रुपये खर्च त्यांना आला. विशेष म्हणजे या पिकाला फारसे कीटकनाशक फवारण्याची गरज नाही आणि खत देण्याची देखील गरज नाही.
शेणखत आणि गोमूत्र वगैरे अशा सेंद्रिय खतांचा त्यांनी वापर केला. केवळ अठरा महिन्यात त्यांना या पिकातून उत्पादन मिळाले. पहिल्या बहरात त्यांना तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले. त्यावेळी 100 ते 150 रुपये प्रति किलो असा भाव त्यांना मिळाला होता.
यंदा मात्र त्यांना 40 ते 45 क्विंटल उत्पादन मिळाले असून 150 ते 180 रुपये प्रति किलो असा भाव त्यांना मिळत आहे. विशेष बाब म्हणजे यातून त्यांना आत्तापर्यंत पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रुट विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांना विक्री करण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. यामुळे त्यांना अधिकचा नफा मिळत आहे.
निश्चितच शेती कसण्याबरोबरच विक्रीचे तंत्र देखील शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आता आवश्यक बाब बनली आहे. जिथे पिकते तिथेच विकू लागले तर शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. एकंदरीत विठ्ठलराव यांनी केलेल्या प्रयोगामुळे शेतकरी है तो लाखो रुपयांची कमाई काढणेही मुमकिन है ! हे खऱ्या अर्थाने आज अधोरेखित होत आहे.