Sugarcane Crop Management : हवामान बदलामुळे आणि खानपानात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये मानवी आरोग्यावर वेगवेगळ्या आजारांचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे फक्त मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे असे नाही तर शेती पिकांवर देखील हवामान बदलाचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोय.
विविध शेती पिके ग्लोबल वार्मिंगमुळे संकटात सापडली आहेत. विविध रोगांमुळे आणि कीटकांमुळे पिकांच्या उत्पादनात घट येत आहे. उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल बनत चालले आहे. ऊस पिकाच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
यामुळे ऊस पिक उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. हेच कारण आहे की अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ऊस पिकात केल्या काही वर्षांपासून लाल कूज या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
ज्याप्रमाणे मनुष्यात कॅन्सर या रोगावर उपचार नाही त्याचप्रमाणे ऊसात आढळणाऱ्या लाल कुज अर्थातच रेड रॉड या रोगासाठी कोणताच उपचार अद्याप सापडलेला नाही. हा रोग को 238 या जातीच्या पिकात सर्वाधिक पाहायला मिळतो.
या रोगामुळे ऊस पिकाची तिसरे आणि चौथे पान पिवळे पडू लागते. उसाच्या खोडावर तांबूस रंगाचे ठिपके दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकातून दारू सारखा वास येतो. हा रोग बुरशीमुळे होतो आणि यावर कोणताच इलाज नाही.
मात्र जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि सुरुवातीच्या टप्प्यातच या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत तर या रोगापासून संपूर्ण पीक खराब होण्यापासून वाचवले जाऊ शकते. यामुळे आज आपण या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ऊस उत्पादकांनी काय केले पाहिजे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोगावर कोणताच उपचार नाही यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना हाच हा रोग थांबवण्यासाठी योग्य उपचार समजला जातो. शेतकऱ्यांनी जमिनीवर जैव बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
लागवडीसाठी नेहमी निरोगी बेणे निवडावे. रोगग्रस्त बेणे निवडू नये. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
या रोगाला प्रतिकार करणाऱ्या बेण्याचीच लागवड केली पाहिजे. ज्या जाती या रोगाला अधिक बळी पडतात त्या जातींची लागवड करू नये असे कृषि तज्ञांनी सांगितले आहे. हा एक बुरशीजन्य रोग आहे म्हणून उसाच्या बेण्यावर योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच लागवड केली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
तसेच रोगग्रस्त शेतातील पाणी कोणत्याही परिस्थितीत निरोगी शेतात जाऊ देऊ नये. जेणेकरून या रोगाची बुरशी निरोगी शेतात पसरणार नाही.