Tur Farming : यंदा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळालेले नाही. सोयाबीन आणि कापूसला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याने या दोन पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी घातक सिद्ध झाली. मात्र यावर्षी तुर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याचे कारण म्हणजे तुरीला खूपच चांगला दर मिळाला आहे.
अजूनही तूर तेजीत आहे. तुरीच्या उत्पादनात घट आली असल्याने दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तूर तब्बल 11,000 रुपये प्रति क्विंटल या दरात विकली जात होती. परंतु आता यामध्ये मोठी घट आली आहे. तुरीचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी झाले आहेत. विदर्भात तुरीचे दर साडेनऊ हजारावर स्थिरावले आहेत.
निश्चितच, हाही दर चांगलाच आहे मात्र अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने तुरीला किमान दहा हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, आता दरात घसरण होत असल्याने शेतकरी बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान तुरीच्या तरात घसरण होण्यामागे केंद्र शासनाचा हात असल्याचे सांगितले जात आहे.
कशामुळे झाली घसरण?
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने तुरीच्या साठ्यावर निर्बंध घातले आहेत. याचा परिणाम म्हणून तुरीचे दर नियंत्रणात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तुरीला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळत होता. मात्र आता कमाल बाजार भाव 9600 रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपले आहेत.
अर्थातच सरासरी बाजारभाव याहीपेक्षा कमी आहेत. विशेष बाब अशी की, आगामी काळात दरवाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती नसल्याचे मत बाजार अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. म्हणून शासनाने घेतलेला हा निर्णय तुरीच्या दरावर ब्रेक लावण्यात यशस्वी झाला असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8800 रुपये प्रति क्विंटल ते 9615 रुपये प्रति क्विंटल दरम्यान तुरीचे व्यवहार झाले आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 9,300 रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान तुरीचे व्यवहार झाले आहेत.