Vande Bharat Express : भारतीय रेल्वे बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, देशातील वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारसह सर्व रेल्वे गाड्यांचे एक्झिक्यूटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे 25 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे.
रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 30 दिवसात वंदे भारत एक्सप्रेस सहित ज्या रेल्वे गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी ॲक्युपॅन्सी अर्थातच प्रवासी संख्या आहे त्या सर्व रेल्वे गाड्यांचे तिकीट दर कमी केले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर कमी होणार असा दावा केला जात होता.
वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात 150 ते 200 रुपयांपर्यंतची घसरण होणार असे सांगितले जात होते. मात्र आता याबाबत एक महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातुन धावणाऱ्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार नाहीये.
खरंतर ही गाडी जेव्हा सुरू झाली तेव्हा म्हणजे डिसेंबर 2022 पासून 16 डब्ब्यांसहित धावत होती. मात्र 16 डब्ब्यांत प्रवासी संख्या कमी राहत होती. यामुळे या नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनचे डब्बे कमी करण्यात आले. मे 2023 पासून या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस केवळ आठ डब्ब्यांसहित धावत आहे.
यामुळे या ट्रेनमधील प्रवासी संख्या अर्थातच एक्यूपॅन्सी ही शंभर टक्क्यांपेक्षा अधिक राहत आहे. या ट्रेनमध्ये आता प्रवास करण्यासाठी आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. या गाडीमधील आठही डब्यात प्रवासी संख्या अधिक असल्याने वेटिंग वाढली आहे.
शिवाय आता गेल्या एक-दोन महिन्यापासून म्हणजेच डब्यांची संख्या कमी केल्यानंतर या ट्रेनमधील ॲक्युपॅन्सी अर्थातच प्रवासी संख्या अधिक झाली असल्याने या गाडीच्या तिकीट दरात कपात होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या ट्रेनने एसी चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी १ हजार २४० तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी २ हजार २४० रुपये एवढे तिकीट काढावे लागत आहे.
दरम्यान भारतीय रेल्वे बोर्डाने वंदे भारत एक्सप्रेससहित सर्वच रेल्वे गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने या गाडीच्या तिकीट दरात सवलत मिळेल अशी अपेक्षा प्रवाशांना होती.
मात्र, प्रवाशांची संख्या (आक्यूपेंसी) जास्त असल्याचे कारण पुढे करीत नागपूर-बिलासपूर व बिलासपूर-नागपूर वंदे भारतचे तिकीट दर कमी होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.