Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांपासून भारतात वंदे भारत एक्सप्रेस या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहे. ही सेमी हायस्पीड ट्रेन पहिल्यांदा 2019 मध्ये चालवली गेली होती. म्हणजेच या ट्रेनला आता जवळपास 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
या पाच वर्षांच्या कालावधीत या ट्रेनची लोकप्रियता खूपच वाढली आहे. ही ट्रेन पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या 51 पैकी 10 गाड्या गेल्या महिन्यात अर्थातच मार्च 2024 मध्ये सुरू झाल्या आहेत. या दहा गाड्यांमध्ये एक गाडी आपल्या महाराष्ट्राला देखील मिळाली आहे.
त्यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या ही आठ वर पोहोचली आहे. दरम्यान आज आपण गेल्या महिन्यात सुरू झालेल्या या 10 वंदे भारत एक्सप्रेस चे रूट मॅप कसे आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नव्याने सुरू झालेल्या दहा वंदे भारत एक्सप्रेस
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या महिन्यात म्हणजेच 12 मार्च 2024 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान महोदय यांनी हिरवा झेंडा दाखवला असून सध्या या नवीन दहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुसाट धावत आहे.
या नव्याने सुरू झालेल्या 10 वंदे भारत गाड्यांमध्ये अहमदाबाद – मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद – विशाखापट्टणम, म्हैसूर-डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई), पाटणा – लखनऊ, न्यू जलपाईगुडी – पटना, पुरी – विशाखापट्टणम, लखनऊ – डेहराडून, कलबुर्गी – सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, रांची – वाराणसी आणि खजुराहो – दिल्ली (निजामुद्दीन) या मार्गांवरील गाड्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत ?
सध्या राज्यात मुंबईहून सहा वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस या नागपूरहून सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.