Weather Update : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद केली जात आहे. या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक आणि पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. यामुळे बळीराजाची चिंता वाढतच आहे. दरम्यान आज राज्यातील 11 जिल्ह्यात पाऊस होणार असा अंदाज आहे. यातील पाच जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उर्वरित राज्यात मात्र आज पावसाची उघडीप राहणार आहे.
खरंतर जून महिन्यात खूपच कमी प्रमाणात मोसमी पाऊस बरसला एक जून ते 21 जून या कालावधीत केवळ 11.5% एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर 23 जून पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. मात्र हा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यातच पाहायला मिळाला.
मध्य महाराष्ट्रात विशेषता घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र पाऊस अजूनही अपेक्षित अशा प्रमाणात पडलेला नाही. दरम्यान आज आठ जुलै 2023 रोजी पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने या संबंधित पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आज ठाणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये ही आज पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे. तसेच उर्वरित राज्यात आज प्रामुख्याने पावसाची उघडीप राहील असा अंदाज आहे.