Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. देशातील विविध भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आपल्या राज्यातही रब्बी पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून राज्यातील विविध भागांमध्ये हरभरा आणि गहू या प्रमुख पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.
मात्र ज्या शेतकऱ्यांना वेळेवर गव्हाची पेरणी करता आली नाही ते शेतकरी बांधव या चालू महिन्यातही गव्हाची पेरणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र डिसेंबर महिन्यात गहू पेरणी करताना शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरे तर गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात पेरणी करता येत नाही ते शेतकरी बांधव पसात गहू पेरणी करतात. पण पसात गहू पेरणी केली तर उत्पादनात मोठी घट येते. यामुळे पसात गहू पेरणी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर उत्पादनातील घट थोडी कमी करता येते.
योग्य जातींची निवड
उशिरा गहू पेरणी करताना शेतकऱ्यांनी गव्हाच्या योग्य वाणाची निवड करणे आवश्यक असते. तसेच गव्हाची पेरणी 25 डिसेंबरच्या पूर्वीच केली पाहिजे. 25 डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत गहू पेरणी करू नये असे सांगितले जात आहे.
तसेच उशिरा गहू पेरणी करताना आगात पेरणी केल्या जाणाऱ्या वाणाची निवड करू नये असे देखील कृषि तज्ञांनी सांगितले आहे. म्हणजे पसात गहू लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आलेल्या जातींचीच निवड करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
गव्हाच्या उशीरा वाणांमध्ये नरेंद्र गहू-1076, राज-3765, PBW-373, K-9162, UP-2425, DBW-14 DBW- 16, K.-9423, P.B.W.-590 यांचा समावेश होतो. जर डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करायची असेल तर शेतकऱ्यांनी या वाणांचीच पेरणी करावी, जेणेकरून पिकाच्या उत्पादनात जास्त तफावत राहणार नाही.
बियाण्याचे प्रमाण योग्य असावे
पसात गहू पेरणी करताना एकरी 55 ते 60 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय बियाण्यावर बीज प्रक्रिया करण्याचा देखील सल्ला दिला जातो. बियाण्यावर बीजोपचार केला नाही तर उत्पादनात घट येण्याची भीती असते. तसेच शेतकऱ्यांनी शक्यतो सीडड्रिलच्या माध्यमातून
गहू पेरला पाहिजे. गहू पेरणी करताना पंधरा ते अठरा सेंटीमीटर चे अंतर ठेवले पाहिजे तसेच बियाणे चार सेंटीमीटर पर्यंत खोलवर पेरले पाहिजे.
योग्य खत व्यवस्थापन करावे
पेरणीपूर्वी एकरी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. यासोबतच पेरणीच्या वेळी 50 किलो डीएपी किंवा 75 किलो एनपीके 12:32:16 आणि 45 किलो युरिया आणि 10 किलो झिंक सल्फेट 21 टक्के मिसळावे. पेरणीनंतर चार आठवड्यांनी पहिले पाणी दिले पाहिजे.