Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. गव्हाची शेती रब्बी हंगामामध्ये केली जाते. रब्बी हंगामात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
गव्हाची पेरणी ही साधारणतः नोव्हेंबर महिन्यात केली जाते. काही शेतकरी मात्र नोव्हेंबर महिन्यात पेरणी करता येणे शक्य होत नसल्याने डिसेंबर महिन्यात देखील याची पेरणी करतात.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते. यंदा कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
तरीही ज्या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे तिथे गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी पाहायला मिळत आहे. दरम्यान काही भागातील गहू पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाळवीला इंग्लिश मध्ये टर्माइट आणि हिंदीमध्ये दिमक नावाने ओळखले जाते. तसेच वाळवीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उधई या नावानेही ओळखले जाते. हे कीटक प्रामुख्याने दमट जागेमध्ये आढळते.
याशिवाय ते जुन्या लाकडांमध्ये देखील आढळते. सध्या मात्र हे कीटक गव्हाच्या पिकातही आढळून येत आहे. यामुळे गव्हाची मुळे कुजू लागली आहेत. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आहे.
अशा परिस्थितीत या कीटकांचा वेळीच बंदोबस्त करावा लागणार आहे. दरम्यान जाणकार लोकांनी या कीटकांच्या नियंत्रणासाठी कोणत्या औषधाची वापर केला पाहिजे याविषयी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
पुसा इन्स्टिटय़ूट अर्थातच भारतीय कृषी संशोधन संस्था यांनी वाळवी नियंत्रणासाठी एक अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गहू पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव झाला असेल तर यावर उपाय म्हणून 50 किलो मातीत 3 लिटर क्लोरपायरीफॉस मिसळून त्याची 1 हेक्टरवर फवारणी केली पाहिजे.
यानंतर मग गव्हाच्या पिकाला एक हलके पाणी दिले पाहिजे. असे केल्यास गहू पिकातील वाळवी बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकते असा दावा तज्ञांनी केला आहे.