Wheat Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. देशातील विविध भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.
आपल्या राज्यातही या दोन पिकांचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान गहू पेरणीचा विचार केला असता गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्यातच केली जाते.
मात्र ज्या शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर पेरणी करता येत नाही असे शेतकरी बांधव डिसेंबर महिन्यात देखील गव्हाची पेरणी करू शकतात. पण उशिराने गहू पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असते.
शिवाय 25 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असे देखील मत तज्ञ लोकांनी वर्तवले आहे. एवढेच नाही तर उशिराने गहू पेरणी करताना पसात लागवडीसाठी उपयुक्त गव्हाच्या वाणाचीच निवड केली पाहिजे असा सल्लाही तज्ञ लोकांनी दिला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण ज्या शेतकऱ्यांनी अजून गव्हाची पेरणी पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांसाठी उशिरा पेरणीसाठी उपयुक्त गव्हाच्या एका विशेष वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
गव्हाची सुधारित जात ?
गव्हाची हलना K-68 ही गव्हाची अशी सुधारित जात आहे जी उशिरा पेरणीसाठी उपयुक्त आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या जातीची पेरणी करता येणे शक्य आहे.
विशेष म्हणजे उशिरा पेरला जाऊ शकणारा गव्हाचा हा वाण अधिक उत्पादनासाठी ओळखला जातो. या जातीपासून 35 ते 40 क्विंटल एवढे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात जो गहू पेरला जातो त्याच गव्हाच्या बरोबरीने या उशिरा पेरल्या जाणाऱ्या गव्हाच्या वाणातून उत्पादन मिळू शकणार आहे.
हा वाण 15 डिसेंबर ते जानेवारीचा पहिला आठवडा या कालावधीत पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
हा वाण सरासरी 120 ते 130 दिवसात परिपक्व होतो. या जातीपासून 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. विशेष म्हणजे फक्त तीन पाण्यामध्ये गव्हाची ही जात परिपक्व होते.