Wheat Variety : गहू हे भारतात उत्पादित केले जाणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान वेळेवर पेरणी केली जाते. तसेच काही शेतकरी बांधव 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत देखील गव्हाची पेरणी करतात.
या कालावधीत उशिरा गहू पेरणीसाठी उपयुक्त वाणाची पेरणी करणे आवश्यक असते. जर सुधारित जातींची निवड केली नाही तर उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असते.
अशा स्थितीत आज आपण शेतकरी बांधवांसाठी उशिराने पेरणीसाठी उपयुक्त असलेल्या गव्हाच्या काही सुधारित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये
ज्या शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करायची असेल मात्र अजून पेरणी केलेली नसेल त्यांनी 15 डिसेंबर पर्यंत पेरणीची कामे पूर्ण करावीत असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
15 डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येण्याची भीती असते. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वेळ न घालवता लवकरात लवकर पेरणीची कामे करून घेणे अपेक्षित आहे.
गव्हाच्या सुधारित जाती
एच डी-२१८९ :- उशिरा पेरणीसाठी उपयुक्त. या जातींचे पीक सरासरी 115 ते 120 दिवसात परिपक्व होते. हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अनुकूल आहे. या जातीपासून हेक्टरी 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे वेळेवर पेरणी करण्यासाठी आणि उशिरा पेरणी करण्यासाठीही या जातीची शिफारस केली जाते.
कैलास (पीबीएन-१४२) :- राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष पूरक आहे. गव्हाच्या या जातीचे पीक इतर जातींप्रमाणेच 115 ते 120 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या वाणापासून 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते. तथापि पिकापासून मिळणारे उत्पादन हे सर्वस्वी पाण्याची उपलब्धता हवामान आणि शेतकऱ्यांचे नियोजन यावर अवलंबून राहणार आहे.
निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) :– गव्हाची ही एक सुधारित जात आहे. या जातीचे पीक लवकर परिपक्व होते. या जातीचे पीक सरासरी 105 ते 110 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
या जातीपासून 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आणि पूरक असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.