Agriculture News : यावर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या तुलनेत तब्बल 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी पावसाचे मोठे असमान वितरण देखील पाहायला मिळाले आहे. म्हणजे राज्यात काही भागात एकदाही पाऊस झाला नाही तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. तसेच यावर्षी ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तिथे देखील कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र मोठे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा खानदेश समवेतचं विदर्भातील बहुतांशी महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.
काही भागात परिस्थिती एवढी बिकट आहे की, आगामी काही दिवसात जर अवकाळी पाऊस झाला नाही तर तिथे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. गुरा-ढोरांचा चाऱ्याचा प्रश्न तर आताच अवघड झाला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची यंदा आत्तापासूनच चिंता वाढली आहे.
यामुळे दूध उत्पादनात देखील घट आली आहे. एकंदरीत महाराष्ट्राला दुष्काळाची झळ बसू लागली आहे. याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरुवातीला 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता.
मात्र नंतर इतरही महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी होती. दरम्यान राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही मागणी गांभीर्याने घेत जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमध्ये 96 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे.
दरम्यान या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच दिले आहेत.
दुष्काळी भागात कोणत्या सवलती लागू होणार ?
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफि, रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, दुष्काळी भागात आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चालवणे, दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे यांसारख्या सवलती लागू केल्या जाणार आहेत.
या सवलती अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांच्या 96 महसूल मंडळामध्ये लागू करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कोणत्या महसूल मंडळात जाहीर झालाय दुष्काळ
कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागपूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी, पारनेर, भालवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेंडगाव, चिंबळे, देव पैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, बंबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही, जामखेड, अरणगाव, खरडा, नात्रज, नायगाव, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, साखरवाडी, राजुर, शेंडी, कोतुळ, ब्राम्हणवाडा, कोपरगाव, रावंडे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, राहता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, अकोले, शिर्डी