Agriculture News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील काही कौतुकास्पद योजनांची सुरुवात केली आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेसारख्या अनेक महत्त्वाकांशी योजना केंद्रातील मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. अशातच आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने आणखी एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे देशभरातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून आता स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या निवेदनावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंडे अकोला येथे शिवार फेरीवर गेले असता तेथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना निवेदन दिले होते.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी हे निवेदन दिले होते. या निवेदनात अग्रवाल यांनी संत्रा फळ पिकाची गळती झाली असून, फळ बागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी विनंती केली होती.
शेतकऱ्याच्या या विनंतीला अनुसरून कृषी मंत्रि मुंडे यांनी राज्याच्या कृषी विभागामार्फत केंद्र शासनाकडे स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी अनुदान मिळावे म्हणून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत सुधारणा सुचवली होती.
याच सूचनेप्रमाणे केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची व्यापकता वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी देखील अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.
यासाठी आता कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती स्थापित केली जाणार आहे. ही समिती या बाबीसाठी अनुदान देणे हेतू निकष निश्चित करणार आहे.
म्हणजे आता या समितीचा अहवाल आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे चित्र तयार झाले आहे. एकूणच काय की, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या तत्परतेमुळे राज्यासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.